Paisa Fund Kaladalan

Paisa Fund Kaladalan पैसा फंड इंग्लिश स्कूल मधील आर्ट गॅलरी येथे कलारसिकांना चित्रे - शिल्पे विकत घेता येतील .

पैसा फंडच्या रिषभ नरबेकरचे चित्र लाडोबा मासिकाचे मुखपृष्ठ ▪️रिषभची कला कौतुकास्पद संगमेश्वर दि. २० ( प्रतिनिधी ):- व्याप...
19/01/2026

पैसा फंडच्या रिषभ नरबेकरचे चित्र लाडोबा मासिकाचे मुखपृष्ठ

▪️रिषभची कला कौतुकास्पद

संगमेश्वर दि. २० ( प्रतिनिधी ):- व्यापारी पैसा फंड संचलित पैसा फंड इंग्लिश स्कुल संगमेश्वर या प्रशालेत नववीच्या वर्गात शिकणाऱ्या निढळेवाडी संगमेश्वर येथील रिषभ विश्वनाथ नरबेकर या विद्यार्थ्याने रेखाटलेले एका अप्रतिम चित्राची पुणे येथील चपराक प्रकाशनने त्यांच्या बाल कुमारांसाठी असणाऱ्या लाडोबा या जानेवारी महिन्याच्या मासिकाचे मुखपृष्ठ म्हणून निवड केली आहे. रिषभच्या या यशासाठी त्याचे अभिनंदन केलं जात आहे.

पैसा फंड इंग्लिश स्कुलने कलेची आवड असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र कलावर्ग आणि कलादालन हा उपक्रम सुरु केला. या उपक्रमाचा विद्यार्थ्यांना खूप मोठा फायदा होत आहे. कलासाधना चित्रकला वार्षिक, डिजिटल कला शिक्षण, विविध प्रात्यक्षिके, कला विषयक प्रोजेक्ट या सर्वांचा विद्यार्थ्यांना त्यांच्या भविष्यातील कला शिक्षणासाठी उपयोग होत असतो. प्रशालेत कलेची आवड असणाऱ्या विद्यार्थ्यांकडून करुन घेतला जाणारा सातत्यपूर्ण सराव हेच विद्यार्थ्यांच्या कला क्षेत्रातील यशाचे खरे गमक आहे. यामुळेच शासकीय रेखाकला परीक्षेचा निकाल नेहमीच १०० टक्के लागून विद्यार्थी अ आणि ब श्रेणी प्राप्त करतात.

रिषभ विश्वनाथ नरबेकर हा नववीच्या वर्गात शिकणारा विद्यार्थी स्वभावाने शांत आणि नम्र असून त्याची चित्रकला चांगली असल्यामुळे त्याच्या कलेवर विशेष लक्ष दिल्यानंतर त्याच्या कलेत अधिक प्रगती होत असल्याचे दिसून आले. रिषभ याने ए्लिमेंटरी या शासकीय रेखाकला परीक्षेत अ श्रेणी प्राप्त केली आहे. गत वर्षी प्रशालेच्या कलासाधना या रौप्य महोत्सवी चित्रकला वार्षिकचे मुखपृष्ठ रिषभ यानेच केले होते. त्याने रेखाटलेल्या काही कलाकृती मधील कासवाचे चित्र पुणे येथील आघाडीच्या चपराक आणि लाडोबा प्रकाशनने जानेवारी २०२६ च्या त्यांच्या मासिकच्या मुखपृष्ठासाठी निवड करुन रिषभच्या कलेचा गौरव केला आहे.

चपराक प्रकाशनने पैसा फंड प्रशालेतील विद्यार्थी रिषभ विश्वनाथ नरबेकर याच्या चित्राचा असा आगळावेगळा सन्मान केल्याबद्दल संस्थाध्यक्ष अनिल शेट्ये, उपाध्यक्ष किशोर पाथरे, सचिव धनंजय शेट्ये, सदस्य संदीप सुर्वे, रमेश झगडे, मुख्याध्यापक सचिनदेव खामकर, पर्यवेक्षक प्रकाश दळवी, रिषभचे पालक विश्वनाथ नरबेकर यांनी चपराक आणि लाडोबा प्रकाशनचे संपादक घनश्याम पाटील, ऑनलाईन संपादक ज्योती पाटील यांना मनापासून धन्यवाद दिले आहेत.तसेच रिषभ याच्या कलेचे कौतुक करुन त्याचे अभिनंदन केले आहे .

पडवे येथील नवोदय विदयालय विद्यार्थ्यांची पैसा फंडच्या कलादालनाला भेट ▪️ कलाकृती पाहून विद्यार्थी भारावले ▪️ कलाविषयक उपक...
19/01/2026

पडवे येथील नवोदय विदयालय विद्यार्थ्यांची पैसा फंडच्या कलादालनाला भेट

▪️ कलाकृती पाहून विद्यार्थी भारावले
▪️ कलाविषयक उपक्रमांबाबत घेतली माहिती

संगमेश्वर दि. १७ ( प्रतिनिधी ):- राजापूर तालुक्यातील पडवे येथील नवोदय विद्यालयाच्या इयत्ता सहावी ते आठवी मधील ८० विद्यार्थ्यांनी शनिवार १७ जानेवारी रोजी व्यापारी पैसा फंड संस्था संगमेश्वर संचलित पैसा फंड इंग्लिश स्कूलच्या कला वर्ग आणि कलादालनाला भेट देऊन प्रशालेतर्फे राबविण्यात येणाऱ्या विविध कलाविषयक उपक्रमांची माहिती घेतली. कलादालनातील कलाकृती पाहून नवोदयचे विद्यार्थी भारावून गेले.

पडवे येथील नवोदय विद्यालय विविध शैक्षणिक उपक्रम राबवत असते. याचाच एक भाग म्हणून आज या विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी पैसा फंड इंग्लिश स्कूल संगमेश्वरच्या कला वर्ग आणि कलादालन उपक्रमाला भेट दिली. कला विभागातर्फे विद्यार्थ्यांना कला वर्गा समोर उभारण्यात आलेल्या पेन्सिलचे महत्त्व समजावून सांगण्यात आले. पैसा फंड इंग्लिश स्कूल संगमेश्वरतर्फे गत २५ वर्षे राबविल्या जाणाऱ्या कलासाधना या चित्रकला वार्षिक उपक्रमाची विद्यार्थ्यांना सविस्तर माहिती देण्यात आली. याबरोबरच कलाविषयक विविध उपक्रम, दैनंदिन सराव, शुभेच्छा पत्रांची निर्मिती, डिजिटल कलाशिक्षण याबाबत सर्व विद्यार्थ्यांना सखोल माहिती देऊन अवगत करण्यात आले. प्रशालेने सुरू केलेल्या कला वर्ग आणि कलादालन उपक्रमाचा कलेची आवड असणाऱ्या विद्यार्थ्यांना कसा लाभ झाला, याविषयी नवोदयच्या विद्यार्थ्यांना विविध उदाहरणांसह माहिती देण्यात आली. हाताला उत्तम वळण येण्यासाठी विद्यार्थ्यांनी दैनंदिन सराव करावा असे आवाहन यावेळी कला विभागातर्फे या विद्यार्थ्यांना करण्यात आले.

पैसा फंड कलादालनात असणाऱ्या कलाकृती पाहून विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर तरळलेला आनंद यावेळी दिसून आला. उत्साही विद्यार्थ्यांनी विविध कलाकृतींसह पैसा फंड इंग्लिश स्कूलच्या कला विभागातर्फे राबविण्यात येणाऱ्या विविध कलाविषयक उपक्रमांबाबत नवोदयच्या विद्यार्थ्यांनी सविस्तर माहिती जाणून घेतली आणि यातील काही उपक्रम आम्ही स्वतः घरी गेल्यानंतर करण्याचा प्रयत्न करू असे विद्यार्थ्यांनी यावेळी नमूद केले . यावेळी प्रसिद्ध चित्रकार विष्णू परीट,जैतापूर हायस्कुलचे उपक्रमशील कलाशिक्षक कुणकवळेकर नवोदयचे विद्यालयचे कलाशिक्षक उन्मेष वेलिंगकर, क्रीडा शिक्षक साहिल यादव, सहाशिक्षिका श्रीयांका बोर्डीकर, आदिती वाघधरे हे उपस्थित होते. व्यापरी पैसा फंड संस्थे तर्फे सचिव धनंजय शेट्ये, मुख्याध्यापक सचिनदेव खामकर यांनी नवोदय विद्यलयचे सर्व शिक्षक आणि प्राचार्य एस. बस्वराज यांना पैसा फंड कलादालनाला भेट दिल्या बद्दल धन्यवाद देण्यात आले. यावेळी चित्रकार विष्णू परीट यांच्या निसर्ग चित्राचे प्रात्यक्षिक संगमेश्वर येथील जाखमाता मंदीर परिसरात आयोजित करण्यात आले होते.

कलाकाराच्या अंतर्मनातील उत्कट प्रतिमा त्यांच्या कलाकृतीत उमटते  : वैभव खेडेकर संगमेश्वर दि. १० ( प्रतिनिधी ):- कलाकाराचे...
10/01/2026

कलाकाराच्या अंतर्मनातील उत्कट प्रतिमा त्यांच्या कलाकृतीत उमटते : वैभव खेडेकर

संगमेश्वर दि. १० ( प्रतिनिधी ):- कलाकाराचे मन हे संवेदनशील असते. त्याच्या अंतर्मनात डोकावल्यानंतर त्याने रेखाटलेल्या कलाकृतीचा खरा अर्थ समजतो. कलाकाराच्या अंतर्मनातील उत्कट प्रतिमा त्याच्या कलाकृतीत उमटत असते, असे प्रतिपादन खेडचे माजी नगराध्यक्ष आणि राजवैभव पतसंस्थेचे अध्यक्ष वैभव खेडेकर यांनी केले.

व्यापारी पैसा फंड संस्था संगमेश्वर संचलित पैसा फंड इंग्लिश स्कूलच्या कलादालनाला भेट दिल्यानंतर येथील कलाकृतींची पाहणी करताना वैभव खेडेकर हे बोलत होते. यावेळी त्यांच्या समवेत संस्थेचे अध्यक्ष अनिल शेट्ये, सचिव धनंजय शेट्ये, सदस्य संदीप सुर्वे, रमेश झगडे, स्नेह ज्योती विद्यालयचे उत्तम कुमार जैन, सह्याद्री शिक्षण संस्थेचे संचालक अनिरुद्ध निकम, संतोष नलावडे, भाजपाचे तालुकाध्यक्ष विनोद म्हस्के, करण खेडेकर, राजवैभव पतसंस्थेचे उपाध्यक्ष नंदू साळवी, प्रदीप भोसले, दिनेश अंब्रे, मुख्याध्यापक सचिनदेव खामकर, पर्यवेक्षक प्रकाश दळवी आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी बोलताना वैभव खेडेकर पुढे म्हणाले की, जिल्ह्यातील अनेक शाळांना आपण भेटी दिल्या मात्र शाळेला जोडून असे भव्य कलादालन असणारे पैसा फंड हायस्कूल पाहून येथे कलेची आगळीवेगळी चळवळ सुरू असल्याचे स्पष्ट होते. उच्च कलाशिक्षण घेण्यासाठी विद्यार्थ्यांचा कला शिक्षणाचा पाया येथे अधिक मजबूत करण्यावर भर दिला जातो, हे अभिनंदनीय आहे. कलादालनात असणाऱ्या सर्वच चित्रांची आणि शिल्पांची वैभव खेडेकर यांनी बारकाईने पाहणी करून त्याविषयी अधिक माहिती जाणून घेतली.

सह्याद्री शिक्षण संस्थेचे संचालक अनिरुद्ध निकम हे स्वतः कलासक्त आहेत. सह्याद्री कला महाविद्यालय आणि त्यांचे कलादालन भव्य दिव्य आहे. कलादालनाला भेट दिल्यानंतर अनिरुद्ध निकम म्हणाले की, पैसा फंड येथील अनेक विद्यार्थी आमच्या सह्याद्री कला महाविद्यालयात उच्च कला शिक्षणासाठी येतात, हे आमच्यासाठी अभिमानाची बाब आहे. एवढेच नव्हे तर पैसा फंडचे विद्यार्थी असणारे अवधूत खातू हे आमच्या कला महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून काम करतात, ही या संस्थेसाठी नक्कीच आनंदाची बाब आहे, असे निकम यांनी नमूद केले.

स्नेह ज्योती अंधविद्यालयाचे उत्तम कुमार जैन यांनी आपले मनोगत व्यक्त करताना म्हटले की, कलाकारांनी रेखाटलेल्या येथील कलाकृती आपण काही पुस्तकांची मुखपृष्ठ म्हणून पाहिल्या आहेत. येथील कलाकृती एकापेक्षा एक सुंदर असून व्यापारी पैसा फंड संस्थेने विद्यार्थ्यांची कला जोपासण्यासाठी तसेच ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी कला वर्ग आणि कलादालनाचा जो उपक्रम हाती घेतला, ही खरंतर काळाची गरज आहे.

फोटो ओळी :

१) पैसा फंड कलादालनात एका बहुचर्चित कलाकृतीची बारकाईने पाहणी करताना वैभव खेडेकर, संतोष नलावडे,उत्तम कुमार जैन, विनोद म्हस्के आदी मान्यवर

२) पैसा फंड कलादालनात कलाकृतींची पाहणी केल्यानंतर उपस्थित मान्यवर

( छाया : मिनार झगडे, संगमेश्वर )

विद्यार्थ्यांनी कलेचा ध्यास घेतल्यास यश निश्चित  !: अण्णासाहेब बळवंत ▪️पैसा फंडच्या कलादालनाला भेट ▪️विदयार्थ्यांची कला ...
06/08/2025

विद्यार्थ्यांनी कलेचा ध्यास घेतल्यास यश निश्चित !

: अण्णासाहेब बळवंत

▪️पैसा फंडच्या कलादालनाला भेट
▪️विदयार्थ्यांची कला कौतुकास्पद

संगमेश्वर दि. ६ ( प्रतिनिधी ):- कला ही दैवी देणगी आहे, ज्यांच्या हाती ती असते ते नक्कीच भाग्यवान. संगमेश्वर येथील व्यापारी पैसा फंड संस्थेच्या पैसा फंड इंग्लिश स्कुलच्या कला विभागाने उभारलेले कलादालन आणि कलावर्ग तालुक्यासाठीच नव्हे तर रत्नागिरी जिल्ह्यासाठी आदर्शवत असा आहे. विद्यार्थ्यांनी कलेचा ध्यास घेतल्यास यश नक्की मिळते असे प्रतिपादन संगमेश्वर पंचायत समितीचे शिक्षण विस्तार अधिकारी अण्णासाहेब बळवंत यांनी केले.

संगमेश्वर येथील पैसा फंड इंग्लिश स्कुल मध्ये पायाभूत चाचणी परीक्षा, तपासणीसाठी संगमेश्वर पंचायत समितीचे पथक शिक्षण विस्तार अधिकारी अण्णासाहेब बळवंत यांच्या नेतृत्वाखाली केंद्रप्रमुख सौ. उज्वला धामणस्कर, संदीप सुर्वे, संतोष जोशी यांच्या समवेत आले असता त्यांनी प्रशालेच्या कलावर्ग आणि कलादालन उपक्रमाला भेट दिली.कलावर्गात कलाविषयक कोणकोणते उपक्रम राबवले,जातात याची देखील माहिती घेतली. कलावर्गासह कलादालनात असणाऱ्या कलाकृती पाहून सर्वांनी समाधान व्यक्त करत सर्व कलाकृतींची बारकाईने पहाणी केली. प्रशालेचे मुख्याध्यापक सचिनदेव खामकर यांनी उपस्थित सर्वांचे स्वागत करुन कलावर्गात राबाविल्या जाणाऱ्या विविध कलाविषयक उपक्रमांची माहिती दिली.

फोटो ओळी :- अण्णासाहेब बळवंतराव शिक्षण विस्तार अधिकारी, सौ. उज्वला धामणस्कर, संदीप सुर्वे संतोष जोशी केंद्रप्रमुख, यांनी पैसा फंड कलादालनाला भेट देवून कलाकृतीची पाहणी केली सोबत मुख्याध्यापक सचिनदेव खामकर

पैसा फंडच्या माजी विद्यार्थ्यांची प्रशालेच्या कलादालनाला भेट ▪️विविध उपक्रमांसाठी दिली देणगी संगमेश्वर दि. २२ ( प्रतिनिध...
22/05/2025

पैसा फंडच्या माजी विद्यार्थ्यांची प्रशालेच्या कलादालनाला भेट

▪️विविध उपक्रमांसाठी दिली देणगी

संगमेश्वर दि. २२ ( प्रतिनिधी ):- संगमेश्वर येथील व्यापारी पैसा फंड संस्थेच्या पैसा फंड इंग्लिश स्कुल कला विभागाने उभारलेल्या कलावर्ग आणि कलादालन उपक्रमास आज सन २००४-०५ दहावी बॅचच्या माजी विद्यार्थ्यांनी भेट दिली. प्रशालेतील विविध कला विषयक उपक्रम पाहून माजी विद्यार्थ्यांनी समाधान व्यक्त केले.

प्रशालेच्या कला विभागाच्या वतीने सर्व माजी विद्यार्थ्यांचे स्वागत करुन प्रशालेत सुरु असणाऱ्या विविध कला विषयक उपक्रमांची सविस्तर माहिती दिली. कलावर्ग, कलादालन उभारल्या नंतर विद्यार्थ्यांना याचा कसा उपयोग झाला, याची कला विभागामार्फत माजी विद्यार्थ्यांना माहिती देण्यात आली. कला विभागातर्फे सुरु करण्यात आलेल्या डिजिटल कला शिक्षण उपक्रमाची माजी विद्यार्थ्यांनी सविस्तर माहिती घेतली. सन २००० साली सुरु करण्यात आलेल्या कला साधना या चित्रकला वार्षिक उपक्रमास यावर्षी २५ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल माजी विद्यार्थ्यांनी कलासाधनाचे सर्व वार्षिक आणि त्यातील चित्रं पाहून विद्यार्थ्यांच्या कला विषयक प्रगतीचे कौतुक केले.

प्रशालेच्या कला विभागातर्फे उभारण्यात आलेले कलादालन हे एक आदर्श कलादालन असून हे पाहण्यासाठी आता राज्याच्या कानाकोपऱ्यातून कलारसिक आणि पर्यटक येतात ही संस्था आणि शाळेच्या कलाविभासाठी अभिमानाची बाब असल्याचे माजी विद्यार्थ्यांनी नमूद केले. प्रशालेत नवीन ईनव्हर्टर घेण्यासाठी तसेच विद्यार्थ्यांना रंगपेटी आणि अन्य कला विषयक साहित्य देण्यासाठी सन २००४-०५ च्या माजी विद्यार्थ्यांनी देणगी दिली. कला विभाग, प्रशाला आणि संस्था यांच्या वतीने या सर्व माजी विद्यार्थ्यांना धन्यवाद देण्यात आले.

( रविवारचा लेख )◾राजचित्र मंदिर !_________________________________________▪️जे. डी. पराडकर  9890086086               पूर...
04/05/2025

( रविवारचा लेख )

◾राजचित्र मंदिर !
_________________________________________

▪️जे. डी. पराडकर 9890086086

पूर्वी ग्रामीण भागातून गावातील अथवा वाडीवरील सार्वजनिक पूजेच्या निमित्ताने पडद्यावर दाखवले जाणारे चित्रपट हेच एकमेव करमणुकीचे साधन होते. गावांत सादर केली जाणारी नमनकला पाहून कंटाळलेल्या स्थानिकांना विरंगुळ्यासाठी काहीतरी नवं हवं असायचं. अशावेळी रात्रीच्या वेळी दाखवले जाणारे पडद्यावरचे चित्रपट ही एक मोठी संधी असे. गावकरी मंडळी अशावेळी सार्वजनिक पूजेची आतुरतेने वाट पाहायचे. पूर्वी पडद्यावर दाखवल्या जाणाऱ्या चित्रपटात अधिकतर ऐतिहासिक, पौराणिक आणि कौटुंबिक चित्रपटांचा समावेश असे. प्रेक्षक हे चित्रपट पहाताना एवढे एकरूप होवून जात, कि प्रसंगानुरूप त्यांच्या नेत्रात पाणी येत असे. चित्रपट हे केवळ करमणुकीचे साधन नव्हतं, तर प्रेक्षकांच्या भावना त्यामागे दडलेल्या असत. पडद्यावरील चित्रपट पाहताना सुरुवातीला दाखवल्या जाणाऱ्या जाहिराती असोत अथवा नव्या चित्रपटाचा ट्रेलर असो, प्रेक्षक पडद्यावर दिसणारे सारे चित्रपट तितक्याच कुतूहलाने पहात. गावा गावात जाऊन पडद्यावर चित्रपट दाखवणे हा त्या काळी एक व्यवसायाचा भाग होता. १९६० च्या दशकात संगमेश्वर सारख्या चित्रपटगृह असणं, ही तशी दुर्मिळ बाब होती. रत्नागिरी जिल्ह्यात हाताच्या बोटावर मोजण्या इतकी चित्रपटगृह कार्यरत होती. अशावेळी संगमेश्वर तालुक्यातील चित्रपट रसिकांसाठी खुद्द संगमेश्वर येथे एखादं चित्रपटगृह असावं या विचारांनी द्वारकानाथशेठ कोळवणकर यांनी पुढाकार घेतला. त्या काळात चित्रपटगृह सुरू करणं हे काही साधी आणि सोपी बाब नव्हती. अनेक अडचणींवर मात करत मोठ्या जिद्दीने द्वाराकानाथशेठ कोळवणकर यांनी संगमेश्वर आठवडाबाजारा नजीक त्यांच्या स्वतःच्या जागेत ५ मार्च १९६० साली “ राज चित्रमंदिर ” या नावाने संगमेश्वर तालुक्यातील पहिले चित्रपटगृह सुरू केले. संगमेश्वर येथे चित्रपटगृह सुरू झाल्याची बातमी जसजशी तालुक्याच्या ग्रामीण भागात पोहोचली, तसा प्रेक्षकांचा या चित्रपट ग्रहाला उदंड प्रतिसाद मिळू लागला. त्याकाळी जाहिरात करणं देखील खूप अवघड असे. अशावेळी नवा चित्रपट लागण्यापूर्वी कोळवणकर गावागावात माणूस पाठवून, अक्षरश: दवंडी पिटावी तशी नव्या चित्रपटाची जाहिरात करत असत. “ राज चित्रमंदिर ” हे करमणुकीचे साधन म्हणून संगमेश्वर तालुक्यासाठी त्याकाळी एक मोठ्या संधीच्या रूपाने उपलब्ध झालेले चित्रपटगृह होतं. या चित्रपट गृहाच्या आठवणी संस्मरणीय आहेत.

कलेची आवड असल्याने शालेय शिक्षणानंतर चित्रपट या विषयाशी आमचा खूप जवळचा संबंध आला. आम्ही कसबा या गावात राहायला असतानाच संगमेश्वर येथे माझ्या जन्मापूर्वी राज चित्रमंदिर हे चित्रपटगृह उभं राहिलं. मी कसबा येथील मराठी शाळेत दाखल झालो आणि वर्दळीच्या ठिकाणी असलेल्या या मराठी शाळेजवळच संगमेश्वर येथील राज चित्रमंदिर या चित्रपटगृहात लागलेल्या नवीन सिनेमाची जाहिरात आम्हाला शाळेतूनच ऐकू येऊ लागली. कुतूहलापोटी मी वर्गाच्या दरवाजा जवळ आलो आणि सिनेमाची जाहिरात करणाऱ्या व्यक्तीकडे पाहू लागलो. किरकोळ शररीरयष्टीची आणि साधारण साडेपाच फूट उंचीची एक व्यक्ती हातात असणाऱ्या एका आरोळी देण्याच्या भोंग्या सारख्या साधनातून जीवाच्या आकांताने राजचित्र मंदिर मध्ये लागलेल्या नव्या सिनेमाची जाहिरात करत होती. त्याकाळी जाहिरात करण्याची अन्य साधन उपलब्ध नसल्याने गावागावात माणूस पाठवूनच अशा जाहिराती कराव्या लागत होत्या. पांढरा लेंगा शर्ट, दाढीचे खुंट वाढलेले, पायात करकरणाऱ्या चामडी वहाणा, एका हातात चित्रपटाच्या जाहिरातींचे कागद, दुसऱ्या हातात चित्रपटाची जाहिरात करण्यासाठी असलेला एक भोंगा, एकाच ठिकाणी उभे राहून चारही दिशांना तोंड करत, हातात असलेल्या भोंग्याच्या माध्यमातून तो चित्रपटाची जाहिरात करत असे. संगमेश्वर वरून टप्प्याटप्प्याने पुढे येत आणि वर्दळीच्या ठिकाणी थांबून चित्रपटाची जाहिरात करणाऱ्या या व्यक्तीचे नाव “ राजा मयेकर ” असे होते. मयेकर जेंव्हा चित्रपटाची जाहिरात करण्यासाठी यायचे, त्या दिवशी आम्हाला सुट्टी असेल, तर माझ्यासहित गावातील सर्व मुलं मयेकरांच्या अवतीभोवती गोळा होत. चित्रपट पाहायला जायचं असो अथवा नसो, आम्ही मयेकरांकडून चित्रपटाच्या जाहिरातींचे कागद मात्र संग्रही ठेवण्यासाठी मागून घ्यायचो .

राजा मयेकर यांची राजचित्र मंदिर येथे नव्याने लागलेल्या सिनेमाची जाहिरात करण्याची पद्धत आगळी वेगळी होती. ते प्रकृतीने जरी किरकोळ असले, तरी प्राण कंठाशी आणून हातात असणाऱ्या भोंग्याद्वारे जोरजोराने आरोळी ठोकत. “ राज चित्रमंदिर संगमेश्वर येथे......... येत्या शुक्रवारपासून........... दररोज तीन खेळ........... आगाऊ बुकिंग सकाळी या...... वेळात केले जाईल..........! याचवेळी ते चित्रपटातील हिरो आणि हिरोईनची नावे सांगून प्रेक्षकांना चित्रपट पाहायला येण्याची अगदी गळ घालत. संगमेश्वरच्या आजूबाजूचा सर्व परिसर पायी फिरून राजा मयेकर राज चित्रमंदिर साठी सिनेमाची जाहिरात करण्याचे काम अनेक वर्षे इमाने इतबारे करत होते. आज पन्नास वर्षे उलटली, तरी माझ्या मनावर राजा मयेकर यांची छबी जशीच्या तशी कोरलेली आहे. कोळवणकर यांनी राज चित्र मंदिर हे चित्रपटगृह आपल्या घरासमोर असलेल्या मोकळ्या जागेत अगदी अवाढव्य स्वरूपात उभं केलं. जवळच शास्त्री नदी वाहते आणि या नदीला भरती ओहोटीचे पाणी येत असल्याने पावसाळ्यात ज्यावेळी पुर यायचा त्यावेळी पुराचे पाणी थेट राज चित्र मंदिर पर्यंत पोहोचायचे. पावसाळ्यातील पूर परिस्थिती लक्षात घेऊन कोळवणकर यांनी मशीनरीचा भाग खूप उंचावर उभारला होता. एवढं करूनही महापुरात तीन- चार वेळा राज चित्रमंदिरचे खूप मोठे नुकसान झाले. या नुकसानावर जिद्दीने मात करत द्वारकानाथशेठ कोळवणकर यांनी काही महिन्यांच्या अथक परिश्रमाने राज चित्रमंदिर परत सुरु केले. संगमेश्वर तालुक्यातील चित्रपट रसिकांना नवे जुने सिनेमे पाहता यावे यासाठी कोळवणकर यांनी घेतलेली मेहनत वाखाणण्याजोगीच होती. विशेष म्हणजे राजचित्र मंदिर मधून कोळवणकर यांना किती लाभ झाला, हा प्रश्न संशोधनाचाच आहे. मात्र चित्रपट रसिकांसाठी कोळवणकर यांनी प्रसंगी नुकसान सहन करून केलेला त्याग, त्या काळचे चित्रपट रसिक कधीही विसरणार नाहीत.

शाळेला सुट्टी झाल्यानंतर आम्ही आमच्या आंबेडखुर्द या गावी जात होतो . गावी गेल्यानंतर खरंतर कोणत्याही करमणुकीची आम्हाला गरजच पडत नसे. गावच्या वातावरणात आम्ही पूर्णतः समरस होऊन जायचो. सर्व भावंड एकत्र आल्यानंतर संगमेश्वर येथील राज चित्रमंदिर मध्ये एखादा नवीन चित्रपट आला असं कळलं, तर सर्वांच्याच मनातून एकत्रित जाऊन हा सिनेमा बघावा असं वाटायचं. मग घरच्या मंडळींची मोठ्या मिनतवारीने परवानगी मिळवून आम्ही भर दुपारी आंबेडखुर्द येथून दोन घाट्या उतरून महामार्गावर बस थांब्यावर यायचो. दीर्घकाळ वाट पाहिल्यानंतर आम्हाला बस मिळायची. त्याकाळी संगमेश्वर येथे केवळ एक दोनच रिक्षा असल्याने भाडं सोडून परत येणारी रिक्षा मिळणे, हे अवघडच असायचं. संगमेश्वर बस स्थानकावर उतरून वेगाने पावले टाकत राज चित्र मंदिर गाठून आम्ही सर्व भावंड प्रथम सिनेमाचं तिकीट हातात मिळवायचो. हे तिकीट मिळाल्यानंतर होणारा आनंद शब्दातून वर्णन करण्यापेक्षा तो चेहऱ्यावरच एकमेकांना पहायला मिळायचा. १९८१ साली “ एक दुजे के लिये ” हा सिनेमा आला होता. काही कालावधीनंतर संगमेश्वर येथील राज चित्रमंदिर मध्ये हा सिनेमा आल्यानंतर, तोच पाहण्यासाठी आम्ही सर्व भावंड राज चित्र मंदिर मध्ये आलो होतो. मुख्य चित्रपट सुरू होण्याआधी पडद्यावर जे काही दाखवलं जातं, ते सर्वच पाहायला मिळायला हवं असं त्यावेळी आमच्या बालमनाला वाटे. मुख्य चित्रपट सुरू झाला की, टाळ्यांचा गजर व्हायचा. उपस्थित काही प्रेक्षक शिट्ट्या देखील मारत. एक दुजे के लिए हा सिनेमा पाहताना आम्ही नकळत गोव्याचा बराचसा भाग फिरून आलो होतो . या सिनेमातील गाणी आणि कथा उत्तम असल्याने आम्हा सर्व भावंडांना हा चित्रपट खूपच भावला. चित्रपट पाहून घरी परत जाताना आम्ही भावंडानी एक- एक बुंदीचा लाडू खाऊन चित्रपट पाहिल्यानंतर प्रसन्न मनाने घर गाठलं. या चित्रपट गृहात आम्ही ऐतिहासिक, पौराणिक सिनेमे पाहिल्याचं मला आजही आठवतंय. तिकीट म्हणाल, तर बाल्कनी १:५० रुपये, आणि पुढे तर ७५ पैसे, ५० पैसे असे सुरुवातीचे दर होते.

राज चित्रमंदिर साठी दर गुरुवारी नवीन चित्रपटाचे रीळ यायचे ते थेट मुंबई, पुणे, सांगली आणि मिरज येथून. एका लोखंडी पेटीत हे सारे रीळ आणि नवीन चित्रपटाची पोस्टर असत. मिरज नायरी या बसच्या टपावरून हे चित्रपटाचे रीळ आले कि, संगमेश्वर बस स्थानकात गुरव नावाचा हमाल ही पेटी उतरवून घ्यायचा. शुक्रवारी सकाळी राज चित्र मंदिरला कोणता सिनेमा लागलाय, हे पहाण्यासाठी रसिकांची पावले थिएटरकडे वळत. राज चित्रमंदिर मध्ये बावा येद्रे नावाचा एक मेहनती माणूस मदतनीस म्हणून काम करायचा. तो राज चित्र मंदिरला स्वतःचे घर समजून सर्व काम पहायचा. राज चित्र मंदिरचे मालक द्वारकानाथ कोळवणकर यांनी चित्रपट दाखविण्याचा जो प्रोजेक्टर आणला होता, तो इंग्लंड येथील बनवटीचा असल्यामुळे अत्यंत दर्जेदार होता. या मशीन मधून दिसणारे चित्र त्याकाळी डिजिटल स्वरूपाचे दिसे. कोळवणकर यांनी चित्रपटगृह सुरु करताना दर्जा मध्ये कोणतीही तडजोड केली नाही. संगमेश्वर येथील ख्यातनाम कलाकार पांडुरंग शेरे, पांडुरंग भिंगार्डे आणि दत्ता अंब्रे हे राज चित्रमंदिरचे मशीन ऑपरेटर म्हणून काम पाहायचे. शेरे आणि अंब्रे हे दोघे उत्तम मूर्तिकार असल्यामुळे चित्रपटगृहातील त्यांचे काम कलात्मक आणि शिस्तबद्ध असेच होते. याबरोबरच अब्दुल्ला खान, नागेश गवळी हे देखील कार्यरत होते. व्यवस्थापक म्हणून शशिकांत सुर्वे तर हिशोबाचे काम दादा संसारे पहात. चित्रपटाच्या मध्यंतरात संगमेश्वर बाजारपेठेतील दुकानाच्या जाहिराती स्लाईडद्वारे दाखवल्या जायच्या. या स्लाईड जवळ भविष्यात आपलाही संबंध येणार आहे, याची त्यावेळी मला पुसटशी कल्पनाही नव्हती.

द्वारकानाथ रामचंद्र कोळवणकर यांनी पहिलं थिएटर संगमेश्वर मधील रामपेठ येथे सुरू केलं. त्यानंतर ते संगमेश्वर येथील लाकडाच्या गिरणी जवळ काही काळ कार्यरत होतं. मग मात्र कोळवणकर यांनी स्वतःच्या जागेत ५ मार्च १९६० रोजी राजचित्र मंदिरची मुहूर्तमेढ रोवली. चित्रपटगृहांचा विस्तार करण्याच्या प्रयत्नात द्वारकानाथशेठ यांनी दाभोळ येथे साई चित्रमंदिर आणि देवरुख येथे राज चित्रमंदिर अशा नवीन दोन शाखा सुरू केल्या होत्या. मात्र ही थिएटर ते फार काळ चालू शकले नाहीत. संगमेश्वर येथील राज चित्र मंदिरला पावसाळ्यात वारंवार पुराचा फटका बसत असे. मात्र १९८३ सह एकूण चार वेळा या चित्रपट गृहाला महापुराचा मोठा फटका बसून खूप मोठी पडझड झाली. यावर देखील मात करत द्वारकानाथशेठ यांनी काही महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर प्रत्येक वेळी राज चित्रमंदिर सुरू केलं होतं. त्यांचे चिरंजीव श्रीप्रकाश, दीपक, विश्वास,तुषार यांनी देखील राजचित्र मंदिरच्या कामात लक्ष घालून वडिलांना मदतीचा हात दिला होता. कसबा येथील माध्यमिक शिक्षण संपवून मी कलेचे शिक्षण घेण्यासाठी कोल्हापूर येथील कलानिकेतन महाविद्यालयात प्रवेश घेतला. कोल्हापूर या कलानगरीत गेल्यानंतर जाहिरातीच्या स्लाईड कशा तयार करतात, याची माहिती घेऊन मी या स्लाईड तयार करू लागलो. विशेष म्हणजे संगमेश्वर बाजारपेठेतील दुकानांच्या जाहिराती या स्लाईडच्या माध्यमातून मी तयार केल्या होत्या. याच स्लाईड १९८५ ते ८७ या कालावधीत राज चित्रमंदिर मध्ये मध्यंतराच्या कालावधीत दाखवल्या जायच्या. आपण बनवलेल्या जाहिरातीच्या स्लाईड, चित्रपट पाहताना मध्यंतरामध्ये दाखवल्या जातात याचा मला त्यावेळी सार्थ अभिमान वाटायचा. एवढेच नव्हे, तर संगमेश्वर येथील काही व्यापाऱ्यांनी आपल्या व्यवसायाची जाहिरात, मी तयार केलेल्या या स्लाईडच्या माध्यमातून रत्नागिरी येथील राधाकृष्ण चित्र मंदिर मध्ये देखील केली होती.

कोल्हापूर येथे कलेचे शिक्षण घेत असताना माझा मावस भाऊ योगेश नाखे याच्यासोबत मी दर शनिवार रविवार कोल्हापुरातील प्रसिद्ध चित्रपटगृहात कलाविषयक सिनेमे पाहत होतो. या प्रत्येक सिनेमाच्या वेळी मला संगमेश्वर येथील राज चित्रमंदिरची आवर्जून आठवण व्हायची. कोल्हापूर हे मोठे शहर होते, त्या तुलनेत संगमेश्वर सारख्या ग्रामीण भागात १९६० साली राज चित्रमंदिर या नावाने पहिले चित्रपट गृह उभारणारे द्वारकानाथशेठ कोळवणकर मला नेहमी आदर्श व्यक्तिमत्व वाटायचे. कोळवणकर यांनी प्रत्येक वेळी स्वतःसह आपल्या कुटुंबाचा फारसा विचार न करता चित्रपट रसिकांचा विचार केला, ही खूप मोठी गोष्ट होती. केवळ त्यांच्यामुळेच संगमेश्वर तालुक्यातील चित्रपट रसिकांना राज चित्रमंदिर मध्ये अनेक नावाजलेले चित्रपट त्याकाळी पाहता आले. १९८६ साली माझे कोल्हापूर येथील कलेचे शिक्षण संपले आणि तेव्हापासूनच चित्रपटगृहात जाऊन सिनेमा पाहणे काहीसे थांबले. केंद्र सरकारच्या क्षेत्रीय प्रचार कार्यालयातर्फे सन २०११ साली २१ दिवसांच्या अभ्यास दौऱ्यासाठी माझी कोलकाता आणि ओरिसा या राज्यांसाठी निवड झाली होती. ओरिसा येथील एका जिल्ह्यात मुक्कामाला असताना जवळच एक चित्रपटगृह होते. या ठिकाणी जाऊन सिनेमा पहायचे सर्वांनी ठरवले आणि जवळपास २५ वर्षांनी मी परत चित्रपटगृहात जाऊन एक हिंदी सिनेमा पाहिला. यावेळी देखील मला संगमेश्वर येथील राज चित्रमंदिरची मात्र प्रकर्षाने आठवण झाली.

द्वारकानाथशेठ रामचंद्र कोळवणकर म्हणजे एक अत्यंत विचारी आणि कल्पक व्यक्तीमत्व होतं. त्यांच्या डोळ्यावर असणारा सोनेरी काड्यांचा चष्मा आणि त्यांची भेदक नजर त्यांच्यामध्ये असलेले आगळे वेगळे गुण नेहमीच अधोरेखित करत असत. संगमेश्वर येथे पहिलं चित्रपटगृह सुरू केल्यानंतर देवरुख आणि दापोली तालुक्यातील दाभोळ या ठिकाणी चित्रपटगृह सुरू करून जिल्हाभर चित्रपटगृहांची साखळी तयार करण्याचं त्यांचं उद्दिष्ट त्या काळात खरोखरच वाखाणण्याजोग आणि मोठ्या धाडसाचं होतं. संगमेश्वर मध्ये कल्पक नेतृत्व गुण असणारी असंख्य व्यक्तिमत्व होऊन गेली, त्यामध्ये द्वारकानाथशेठ यांचं नाव अग्रक्रमानं घ्यावं लागेल. ५ मार्च १९६० साली सुरु झालेला राज चित्रमंदिरचा संगमेश्वर येथील प्रवास बरोबर ४७ वर्षांनी म्हणजेच २००७ साली थांबला. द्वारकानाथशेठ यांच्या मुलांनीही वडिलांच्या खांद्याला खांदा लावून राज चित्र मंदिरचे काम पाहिले. आता संगमेश्वर येथील राज चित्रमंदिर हे चित्रपटगृह बंद होऊन १८ वर्षांचा कालावधी उलटला. असं असलं तरी या चित्रपटगृहा विषयी असणाऱ्या आठवणी आजही तेवढ्याच संस्मरणीय आणि ताज्या आहेत. बदलत्या काळात ज्या दिवशी चित्रपट रिलीज होतो, त्याच दिवशी तो व्हाट्सअप वर मिळतो एवढा काळ गतिमान झाला आहे. सिनेमा पाहायला आता चित्रपटगृहात जावं लागत नाही. घरातील टीव्ही संचावर अथवा खिशातील मोबाईलवर तुम्ही असाल तेथे नवनवीन चित्रपट पाहू शकता. असं असलं तरीही आमच्या शालेय जीवनात आम्ही संगमेश्वर येथील राज चित्रमंदिर मध्ये पाहिलेल्या सिनेमांचा आनंद आताच्या या गतिमान काळातील विविध माध्यमातून घेता येत नाही एवढं मात्र खरं.

चित्रं : आदित्य पराडकर, पुणे

[email protected]

( रविवारचा लेख ) ◾बर्फाचं आईस्क्रीम !________________________________▪️जे. डी. पराडकर  9890086086                    आईस...
06/04/2025

( रविवारचा लेख )

◾बर्फाचं आईस्क्रीम !
________________________________
▪️जे. डी. पराडकर 9890086086

आईस्क्रीम म्हटलं, की लहान मुलांच्या तोंडाला चटकन पाणी सुटतं. उन्हाळ्याच्या हंगामात तर आईस्क्रीम खावं असं प्रत्येक व्यक्तीला वाटत असतं. उन्हाळी हंगामात शीतपेयांना असणारी मागणी वाढत जाते. जसे शीतपेयांमध्ये सध्या अनेक प्रकार आहेत तसेच ते आईस्क्रीम मध्ये देखील असल्याचे पाहायला मिळते. आधुनिक काळात शीतपेय असोत अथवा आईस्क्रीम दररोज नवनवीन काहीतरी पाहायला मिळते. आईस्क्रीमचा मोह टाळणं लहान मुलांना अशक्य होतं. आईस्क्रीम मिळण्यासाठी प्रसंगी लहान मुलं हट्ट देखील करतात. ज्या वयात ज्या गोष्टी मिळणं आवश्यक असतं, त्या मिळाल्या तर एक वेगळ्याच प्रकारचा आनंद अनुभवायला मिळतो. अर्थात प्रत्येकाच्या बाबतीत असं घडतच असं नाही. परिणामी काही गोष्टी आठवणींच्या कोंदणात जाऊन बसतात. आईस्क्रीम सारखी गोष्ट देखील तुम्हाला तुमचं बालपण आठवण देते. पूर्वीच्या काळी शिक्षण घेत असताना शैक्षणिक साधन मिळणं देखील अशक्य होतं. अशावेळी आईस्क्रीम खाण्याचे मनसुबे खिशात “ आणा ” नसल्याने बर्फाच्या थंडाव्यासारखेच थिजून जायचे. जुनी पुस्तक अर्ध्या किंमतीत घेऊन वापरण्याच्या त्या काळात खाऊला पैसे मिळणं अशक्यच असे. त्यामुळे परिस्थिती अभावी प्रत्येक वस्तूचा मोल जाणण्याचे संस्कार मुलांवर आपोआप होत असत. याबरोबरच कोणत्या गोष्टीसाठी किती हट्ट करावा ? याची जाण मुलांना आपोआप आलेली असे. ज्या दिवशी घरातून खाऊला पाच - दहा पैसे मिळतील, तो दिवस अक्षरशः दिवाळी सारखा वाटायचा. त्या काळात पॉकेटमनी ही संकल्पनाच अस्तित्वात नव्हती. अशावेळी केवळ १५ पैशांना मिळणाऱ्या त्या लाल रंगाच्या बर्फाच्या आईस्क्रीमची मज्जा काही औरच होती. आता कितीही उच्च दर्जाची आईस्क्रीम आली असली आणि चाखायलाही मिळाली असली, तरी बालपणी शाळेसमोर मिळणाऱ्या त्या पंधरा पैशाच्या बर्फाच्या आईस्क्रीमची सर कशालाच येऊ शकत नाही हे शाश्वत सत्य आहे.

आमचं प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण ऐतिहासिक कसबा या गावात झालं. कसबा गावच्या बस थांब्याजवळ असणाऱ्या प्राथमिक शाळेत चौथीपर्यंत शिक्षण घेत असताना कोणत्याही प्रकारचं आईस्क्रीम शाळेबाहेर खाल्ल्याचं मला तरी आठवत नाही. त्याकाळी मराठी शाळेतील मुलांना खाऊसाठी पालकांकडून पैसे मिळणं ही अशक्य बाब असल्याने प्राथमिक शाळेच्या बाहेर आइस्क्रीमचे विक्रेते येतच नसत. त्या काळात कुल्फी अस्तित्वात होती. मात्र आमच्या आठवणीत कसबा गावात कुल्फी विक्रेते यायचे, ते फक्त महाशिवरात्रीच्या दिवशी. आम्ही तर महाशिवरात्रीला कुल्फी विक्रेते मुळये यांची अक्षरश: चातकासारखी वाट पाहत असायचो. मुळये यांच्याकडे दोन प्रकारच्या कुल्फी मिळत असत. साधी कुल्फी १५ पैसे, तर दुधाची २५ पैशांना मिळे. या कुल्फीचे रंग पाहूनच ती खावीशी वाटत असे. प्रत्यक्षात त्याची चव लाजवाब होती. कुल्फी तयार करताना घेतली जाणारी मेहनत, दर्जेदार मालाचा वापर आणि ग्राहकाला सर्वोच्य स्थानी मानून व्यवसाय करण्याचं असलेलं त्यावेळेचं व्रत, हेच चवीमागील खरं गुपित होतं. घशाला अपाय होईल असे कोणतेही घटक वापरण्याचे पाप त्यावेळच्या काळात उपलब्ध देखील नव्हते. महाशिवरात्रीला कसबा गावात मुळ्ये आपली कुल्फीची गाडी घेऊन आले, की त्यांना प्यायला पाणी नेऊन देणे, मध्येच चहा पुरवणे अशी कामे आम्ही करत होतो. यामुळे गाडीवर कुल्फी बनविण्याची प्रक्रिया पाहायला तर मिळायची शिवाय मुळ्ये कडून कुल्फीचे बक्षीसही मिळायचे. खरंतर एखादी कुल्फी मिळावी, याच उद्देशाने आमची ही सारी धडपड सुरू असे. कोणतेही मूल्य न देता, बक्षीस स्वरूपात मुळ्ये यांच्याकडून मिळालेल्या त्या कुल्फीचा आनंद बालपणी आमच्यासाठी कितीतरी मोठा होता.

कसबा येथील प्राथमिक शाळेतून चौथीपर्यंतचे शिक्षण घेतल्यानंतर पाचव्या इयत्तेसाठी याच गावातील हायस्कूल मध्ये प्रवेश घेतल्यानंतर शाळेच्या बाहेर विविध प्रकारचे विक्रेते येत असल्याचे पाहायला मिळाले. सुरुवातीचा काळ जेवणाच्या सुट्टीत डबा खाल्ल्यानंतर कोणकोणते विक्रेते काय काय घेऊन येतात? हे पाहण्याचा केवळ आनंद घेण्यातच गेला. वडील याच शाळेत शिक्षक असल्याने आणि त्यांची शिस्त बाहेर कोणतेही पदार्थ खाऊ नयेत अशी असल्याने हातावर खाऊ साठी एखादं नाणं पडण्याची शक्यता नव्हतीच. विविध प्रकारच्या वस्तू ते घरी घेऊन येत असत मात्र उघड्यावरचे काही खाऊ नये असा त्यांचा दंडक होता. वडील कमालीचे शिस्तीचे असल्याने त्यांच्याकडे खाऊ साठी पैसे मागण्याचा प्रश्न कधी उद्भवलाच नाही. शाळेतून घरी येताना या मार्गावर असणाऱ्या एका चण्याच्या भट्टीवरून दर शुक्रवारी आमचे वडील १५ पैशांची चण्याची पुडी घेऊन येत असत. यापुडील चणे त्यावेळी घरातील सर्वांनाच पुरायचे. शाळे बाहेर येणाऱ्या आईस्क्रीम विक्रेत्यांकडे मिळणारे बर्फाचे लाल रंगाचे आईस्क्रीम मला अनेकदा खुणावायचे . दूर अंतरावर उभे राहून, मी त्या आईस्क्रीम विक्रेत्याच्या भोवतालचा माहोल पहात असे. बर्फाच्या आईस्क्रीम पाठोपाठच प्लास्टिक पिशवीत मिळणाऱ्या पेप्सीचा जन्म झाला. कसबा गावातच प्रकाश पाथरे या लघु उद्योजकाने “ प्रीतम आईस्क्रीम सेंटर ” सुरू केले आणि येथूनच छोटे विक्रेते पेप्सी आणि बर्फाचे आईस्क्रीम खरेदी करून शाळेजवळ विक्रीसाठी आणू लागले. कसबा येथे राजाराम बेंडके यांनी देखील बर्फाची दोन रंगाची कँडी तयार करण्याचे सेंटर सुरु केले होते. मात्र काही कालवधीनंतर राजाभाऊ नोकरी निमित्त रत्नागिरी येथे गेल्याने त्यांनी आपले बर्फ कँडी सेंटर बंद केले.

कर्नाटक, सोलापूर येथून आपले नशीब आजमावण्यासाठी संगमेश्वर येथे राहायला आलेल्या काही मंडळींनी प्रथम शाळेच्या बाहेर उभं राहून आईस्क्रीम विक्रीचा व्यवसाय सुरू केला. कसबा येथे पाथरे यांच्या आईस्क्रीम सेंटरवर जाऊन बर्फाचे आईस्क्रीम खरेदी करायचे आणि त्यांच्याकडीलच हवाबंद पेटीतून शाळेबाहेर आणून विक्री करायचे. दिवसभरात किमान दोन वेळा त्यांची आईस्क्रीमची पेटी रिकामी होत असे. दुपारी होणाऱ्या जेवणाच्या सुट्टीत आणि त्यानंतर तीनच्या दरम्यान होणाऱ्या दहा मिनिटांच्या सुट्टीमध्ये हा आईस्क्रीम विक्रीचा व्यवसाय चालायचा. संगमेश्वर येथील कलाकार ऋषिकांत शिवलकर हे देखील कुल्फी व्यवसाय करण्यासाठी कसबा हायस्कुल बाहेर येत असत. शिवलकर यांच्या मिश्किल बोलण्याचे शाळकरी मुलांना मोठे आकर्षण होते. काही कालावधीतच हातगाडीवर कोन आईस्क्रीम विक्रीसाठी आलेले पाहून मुलांनी या गाडीकडे धाव घेतली. मात्र या कोन आईस्क्रीमची किंमत पेप्सी आणि बर्फाच्या आईस्क्रीम पेक्षा अधिक असल्याने सुरुवातीचे काही दिवस अनेक मुलांना या कोन आइस्क्रीमची चव केवळ दृष्टीनेच अनुभवावी लागली. भोवती बर्फ असलेल्या एका गोल डब्यामध्ये असणारे हे आईस्क्रीम एका मोठ्या चमच्याने घासून घासून कोनामध्ये भरले जाई. आईस्क्रीम कोनाच्या तळापर्यंत पोहोचावे म्हणून आईस्क्रीम विक्रेत्याला आपला हात या हातगाडीवर जोरजोराने आपटावा लागे. कोन आईस्क्रीम खरेदी करणारी मुलं त्यावेळी श्रीमंत समजली जात. ज्यांच्याकडे कोन आईस्क्रीम घेण्यासाठी पैसे नसत, ती मुलं गाडीमध्ये असणाऱ्या गोल डब्यातून चमच्याने घासून घासून हे आईस्क्रीम कोनात कसे भरले जाते ? ती प्रक्रिया पाहण्यातच आनंद मानत. पाहणाऱ्या मुलांच्या या गर्दीत मी देखील आपली मान उंचावून ही प्रक्रिया पाहण्याचा आनंद लुटला आहे. आनंद हा मानण्यात असतो, हे बालवयातच आम्हाला शिकायला मिळाले होते.

कधीकाळी घरी आलेल्या नातेवाईकांकडून कौतुकाने २५ पैशांचे नाणे हातावर पडले तर, मनाला होणारा आनंद अवर्णनीय असे. लगेचच या पैशातून काही खरेदी न करता थोडे दिवस हे नाणे स्वतःजवळ बाळगण्यात देखील मोठा आनंद वाटे. खरंतर २५ पैशांचे नाणे हातावर पडल्यानंतर यामधून काय खरेदी करायचे ? हे त्याच क्षणी ठरलेले असे. शाळेबाहेर हवाबंद पेटीमध्ये असणारे ते लाल रंगाचे बर्फाचे आईस्क्रीम आपल्या जिभेला कधी स्पर्श करणार ? असा प्रश्न मनात कायम असे. हातावर पडलेले २५ पैशांचे नाणे, हे त्या प्रश्नाला मिळालेलं जणू उत्तरच असे. तरीही मनावर दगड ठेवून चार-पाच दिवस हे नाणे स्वतः जवळ ठेवून नंतरच आईस्क्रीम घ्यायचे, हे देखील मनाशी पक्के झालेले असे. मिळालेले २५ पैशांचे नाणे घरातच प्रथम सुरक्षित ठेवले जायचे. खिशातून जर हे नाणं शाळेत घेऊन गेलो आणि ते हरवले तर ? याची फार मोठी भीती मनाला वाटायची. संयम हा बालपणीच वडिलांनी आमच्या मनावर केलेला खूप मोठा संस्कार होता. बालपणीच्या या अशा संस्काराचे महाविद्यालयीन जीवनात अथवा त्यानंतर मला अनेक फायदे झाल्याचे अनुभवायला मिळाले. प्रत्यक्षात ज्या दिवशी आपल्या पैशांनी बर्फाचे आईस्क्रीम घ्यायचे असेल, त्यादिवशी २५ पैशांचे हे नाणे अत्यंत सुरक्षितपणे, खिशातून वारंवार चाचपणी करून शाळेत घेऊन जाण्याचा आनंद काही वेगळाच होता. खरंतर आम्ही राहात असलेल्या ठिकाणापासून पाथरे यांचे आईस्क्रीम सेंटर अगदी हाकेच्या अंतरावर होते. मात्र दुपारी जेवणाच्या सुट्टीतच सर्व मुलांसमोर बर्फाचे आईस्क्रीम खाऊन आपली जीभ लाल आणि मन रंगीबेरंगी करण्याचा आनंद काही औरच होता.

अखेर तो दिवस उजाडला, आज २५ पैशांचे ते नाणे खिशातून सुरक्षित घेऊन जाऊन, दुपारी जेवणाच्या सुट्टीत बर्फाचे आईस्क्रीम घ्यायचे, हे मी मनाशी पक्के केले. सकाळपासूनच आज आईस्क्रीम खायचे, म्हणून माझे मन आनंदी होते. शाळेची घंटा झाल्यानंतर जेवणाच्या सुट्टीपर्यंतचे पुढील चार तास कधी एकदा संपणार ? याची मनाला प्रतीक्षा होती. अखेर चौथा तास संपल्याची घंटा झाली आणि हात धुवून मी जेवणाचा डब्बा पटापट संपवण्याचे काम केले. वर्गातून बाहेर पडून मी बर्फाचे आईस्क्रीम खरेदी करण्यापूर्वी माझे मन त्या आईस्क्रीम विक्रेत्यापर्यंत पोहोचले होते. अनेक मुले आईस्क्रीम विक्रेत्याकडून बर्फाच्या आईस्क्रीमची खरेदी करत होते. आपल्याला मिळेपर्यंत ते संपू नये, यासाठी मी देखील लगबगीने या घोळक्यापर्यंत पोहोचलो. आईस्क्रीम विक्रेत्या भोवती पैसे घेतलेल्या अनेक छोट्या हातांचे कोंडाळे होते. कधीतरी माझ्या हातातून विक्रेत्याने २५ पैशाचे नाणे घेतले आणि पेटीत हात घालून लाल रंगाचे ते बर्फाचे आईस्क्रीम आणि सोबत उरलेले दहा पैसे माझ्या हातावर ठेवले. बर्फाच्या आईस्क्रीमचा माझ्या हाताला थंडगार स्पर्श झाल्यावर आधी माझे मन शांत झाले. मुलांच्या घोळक्यातून थोडं लांब जाऊन उभे राहिल्यानंतर मी काही काळ या आईस्क्रीमकडे शांतपणे पहातच होतो. बर्फाच्या आईस्क्रीमची चव घेण्यासाठी कितीतरी दिवस लागल्याने, या आईस्क्रीम मध्ये असं आहे तरी काय ? हे आधी न्याहाळून घ्यावं म्हणून मी एक टक या आईस्क्रीम कडे पाहत होतो.

बर्फाच्या आईस्क्रीमला असलेली ती बांबूची काडी हातात घेतल्यानंतर या बर्फावर आपली जीभ फिरवण्याआधी मी माझी नजर हळुवार फिरवून घेतली. पहिल्या नजरेतच मला याच्या अमृततुल्य चवीचा अंदाज आला. स्वप्न छोटसं का असेना, पण ते जेव्हा साकार होतं, त्यावेळी होणारा तो आनंद शब्दातीत असतो. या आनंदाची जाण सर्वाधिक आपल्या मनालाच होत असते. मनातून ते शब्दात उतरवणे खरंतर त्याच वेळी शक्य असतं. लाल रंगाचे हे बर्फाचे आईस्क्रीम माझ्या जिभे जवळ जात आहे, की माझी जीभ या आईस्क्रीम पर्यंत पोहोचत आहे याची वाट पाहणं आता संपलं होतं. दोन्ही गोष्टी अत्यंत वेगाने घडल्या आणि चव आणि मन यांचा संयोग झाला. या संयोगा दरम्यान प्रथम हळुवारपणे माझे नेत्र आपोआप मिटले गेले. अत्युच्य आनंदाच्या क्षणी एखादी कृती आपोआप घडते, त्यातलाच हा एक प्रकार होता. रसनेने जे अनुभवलं ते अमृता समान होतं, एवढंच याविषयी सांगता येईल. लाल रंगाच्या बर्फाच्या आईस्क्रीमवर हळुवारपणे फिरणारी माझी जीभ बहुदा या आईस्क्रीमला सांगत असावी, की तू संपूच नकोस ! जिभेच्या प्रत्येक स्पर्शानंतर रसनेला चढणारी लाली माझ्या मनालाही चढत होती. बालमन किती छोट्या छोट्या गोष्टीतही आनंदाने सामावून जातं याचीच अनुभूती मी त्यावेळी घेत होतो. हवेतील उष्णता आणि अनंत काळच्या प्रतीक्षेनंतर माझ्या जिभेच्या चटक्याने बर्फाच्या, त्या लाल आईस्क्रीमचा आकार हळूहळू शंकू सारखा होऊ लागला. जिभेने चटकाही देता येतो, हे बहुदा मला बालवयातच कळले असावे.

आमचं हायस्कुलचे शिक्षण संपलं आणि त्यासोबतच बर्फाच्या कँडी जवळील असणारे ऋणानुबंध देखील संपुष्टात आले. ठराविक वयातच ही अशी वेगळी आकर्षणं असतात. ती त्या त्या वेळी पूर्णत्वास गेली, तर त्याच्या आठवणी अविस्मरणीय ठरतात. बर्फाच्या कँडी सोबत पेप्सीवाला देखील आमच्या शाळेजवळ येत असे मात्र आम्हाला या पेप्सीने कधीही जवळ ओढलं नाही अथवा आम्हालाही तिच्या बद्दल कधी खास असं आकर्षण वाटलं नाही. पुढे ज्या ज्या वेळी आमच्या हातावर एखादं नाणं पडलं, त्या त्या वेळी मी बर्फाची कँडीच खाल्ली आहे. काही कालवधी नंतर शाळेजवळ बर्फाचे गोळे विकणारा देखील येवू लागला होता, मात्र आमच्या लेखी कँडीची सर बर्फाच्या गोळ्याला कधीच येवू शकणार नव्हती. सुट्टीच्या दिवशी आम्ही घराजवळ असणाऱ्या प्रकाश पाथरे यांच्या प्रीतम आइस्क्रीम सेंटर मधून बर्फाची लालेलाल कँडी घेऊन यायचो. आमचं माध्यमिक शिक्षण संपलं तसं शाळेजवळ पूर्वी येणाऱ्या संगमेश्वर येथील आइस्क्रीम विक्रेत्यांनी देखील आपले व्यवसाय बदलले. ऐन उमेदीत या आइस्क्रीम विक्रेत्यांनी कमालीचे कष्ट घेतल्यामुळे आज ते सुस्थितीत आहेत. आम्ही देखील उच्च शिक्षणानंतर नोकरीत स्थिरावलो. असं असलं, तरी वर्षातून एकदा तरी कसबा येथील पाथरे यांच्या आइस्क्रीम सेंटर मध्ये सर्वांना घेऊन जाऊन बर्फाची ‘ ती ’ कँडी आणि अन्य आइस्क्रीम खाल्ल्याशिवाय आमचं वर्ष संपत नाही. कदाचित यामुळेच बर्फाच्या आइस्क्रीम बाबत असणाऱ्या आठवणी अधिक घट्ट होत जात असाव्यात. बदलत्या काळात आइस्क्रीमचे अनेक प्रकार उपलब्ध झाले आहेत. आता तर अगदी ग्रामीण भागातील मुलांना देखील दररोज पॉकेटमनी दिला जातो. मात्र आमच्या बापणीच्या २५ पैशातील त्या बर्फाच्या कँडीची सर अन्य कोणत्याही आइस्क्रीला येणार नाही एवढं मात्र खरं.

jdparadkar@gmail.कॉम

*चित्र : हेमंत सावंत, चित्रकार पुणे*

Address

Sangameshwar
415611

Opening Hours

Monday 9am - 5pm
Tuesday 9am - 5pm
Wednesday 9am - 5pm
Thursday 9am - 5pm
Friday 9am - 5pm
Saturday 9am - 5pm

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Paisa Fund Kaladalan posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Museum

Send a message to Paisa Fund Kaladalan:

Share

Category